फलटण – सकल मराठा क्रांती मोर्चाचे अग्रणी ठरलेले मनोज जरांगे पाटील हे शुक्रवार, दि. 20 रोजी ऐतिहासिक फलटण शहरात येत आहेत. त्यावेळी छत्रपती शिवाजी चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.
मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करून राज्य व केंद्र सरकारला घाम फोडल्यानंतर अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथे कोट्यवधी मराठा समाजाला एकत्र करून दि. 14 ऑक्टोबर रोजी जागतिक विक्रमाची नोंद करणारी सभा जरांगे पाटील यांनी यशस्वी केली. त्याचवेळी राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेटम देवून ते प्रथमच पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत. दरम्यान श्री. जरांगे पाटील यांचे शुक्रवार, दि.20 रोजी त्यांचे सायंकाळी सात वाजता फलटण येथे येत आहेत.
त्यांचे फलटण नगरीत मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार असून 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सभेला व मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.