पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना पुरेशी औषधे उपलब्ध व्हावीत, तसेच रुग्णालयातील संभाव्य विषाणू संसर्गापासून त्यांना सुरक्षित राहता यावे, यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम (सीजीएचएस) कार्यालयामार्फत एकऐवजी आता तीन महिन्यांची औषधे देण्यात येत आहेत.
केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत सीजीएचएस कार्यालये देशभर कार्यरत आहेत. पुण्यातही मुकुंदनगर येथे हे कार्यालय आहे. सीजीएचएसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुणे शहरातील 52 हजार 530 केंद्रीय आजी-माजी कर्मचाऱ्यांनी स्मार्ट कार्ड घेतली आहेत. यामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा आरोग्याच्या सुविधा मोफत देण्यात येतात. त्यामुळे त्याचा फायदा 1 लाख 19 हजार 131 नागरिकांना होत आहे. मात्र, सध्या रुग्णांना रुग्णालयात यावे लागू नये, तसेच त्यामुळे होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी अतिरिक्त औषधे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे विभागाच्या असिस्टंट डायरेक्टर डॉ. अनुराधा सोंडूर म्हणाल्या, “केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना औषधाबाबत अडचण होऊ नये. याकरिता तीन महिन्यांची औषधे देत आहोत. रुग्णाला दवाखान्यात येणे शक्य नसेल, तर त्याच्या नातेवाईकांपैकी कोणीही स्मार्ट कार्ड घेऊन आले तरीही त्यांना औषधे, गोळ्यांचा पुरवठा करत आहोत. अगदी ब्लड प्रेशर, मधूमेह यासारख्या आजारांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांच्या गोळ्या पुरविण्यात येत आहेत.