वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाची शासनास शिफारस
पुणे – महापालिकेने प्रस्तावित केलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय राज्य शासनाच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आले आहे. महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी आवश्यक बाबींची पाहणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने नेमलेल्या तीन सदस्य समितीने आपला अहवाल दिला आहे. त्यानुसार महापालिकेस हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची शिफारस संचलनालयाने राज्य शासनाकडे केली आहे. त्यामुळे, पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय आवारात हे महाविद्यालय उभारले जाणार आहे, त्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाकडे मान्यतेची शिफारस केल्यानंतर संचलनालयाने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांचे पथक नेमले होते.
या पथकाने महाविद्यालयाची जागा, संलग्न हॉस्पिटल, अध्यापनाची सुविधा, शिक्षक व इतर कर्मचारी अशा मानकांची तपासणी केली. त्यानंतर या पथकाने आपला अहवाल सादर केला आहे. यानुसार संचलनालयाने वैद्यकीय शिक्षण विभाग व औषधी द्रव्य विभागास शिफारस केली आहे.