मुंबई : मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेली राज ठाकरे यांची मनसे आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु होणार असून पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे.तसेच पहिली नोंदणी राज ठाकरे यांनी करत या मोहिमेला सुरुवात केली.
मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी या मोहिमेला सुरुवात झाली आहे. 2014 पासून मनसेच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागला आहे. त्यानंतर मनसेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला. आता मनसेच्या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड दिल्याने मनसेची पुढची राजकीय भूमिका आता स्पष्ट झाली आहे.
शस्त्रक्रिया आणि विश्रांती अशा दोन महिन्याच्या कालावधीनंतर राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आले आहेत. आगामी निवडणुकांपूर्वी राज्यभर मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी मनसेने नवे घोषवाक्य जाहीर केले आहे. ‘मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक’ असे मनसेचे नवे घोषवाक्य असणार आहे..
दरम्यान मनसेच्या या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्त्वाचा मुद्दा जोडण्यात आला आहे. यापूर्वी पक्ष स्थापनेवेळी राज ठाकरे यांनी ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ हे घोषवाक्य दिले होते.