पुणे – आंबेडकरी चळवळीचे आधारवड व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष, शिक्षण महर्षी एम. डी. शेवाळे यांचे अल्पश: आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, सुन, चार मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
रिपाई (आठवले गट) पक्ष संघटन वाढीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याबरोबर भूमिहिनांच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतला. रिपाईच्या ऐक्यासाठी प्रयत्न केले. चळवळीसाठी अनेक कार्यकर्ते घडविले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक काम केले. त्यांनी पर्वती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. अल्प मताने त्यांचा पराभव झाला.
उद्या (बुधवार, दि. 18) 11 वाजता गोळीबार मैदान शेजारी धोबी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी नाना पेठेतील अहिल्या आश्रमाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून धोबी घाटापर्यंत अंत्ययात्रा निघणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवर अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.