मुंबई : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचा 85 हजार 240 रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.
शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना दि 14 मे रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे शिवडी येथे तपासणी केली. चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचा आढळला तसेच खाद्यरंग आढळून आला.
हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेवून उर्वरित 429 किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत 85 हजार 240 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत .संबंधितांच्याविरोधात शिवडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे.