कर्जत : माथेरान हे पर्यटन क्षेत्र जगाच्या नकाशावर कायमस्वरूपी झळकत राहावे, यासाठी संपूर्ण प्रभागात विकास कामे पूर्ण झाली पाहिजेत. येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधांचा अभाव जाणवू नये यासाठी प्रयत्न करण्यासाठी माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी आपल्या आजवरच्या तीन वर्षाच्या कार्य काळात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले असून, आपल्या परीने जेजे शक्य होत आहे, त्या कामांचा पाठपुरावा करून संबंधीत अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे राजकीय वरिष्ठांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील दिसत आहेत.
एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांची मुंबई (बांद्रा) येथील कार्यालयात भेट घेऊन माथेरान फिनिक्युलर रेल्वे बनविणे कामी समिती गठीत केल्या बाबतीत तसेच माथेरान येथे सुरू असलेल्या कामामुळे लॉकडाऊनच्या काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाले. प्रकरणी नगरपालिकातर्फे अभिनंदन आणि आभाराचे पत्र दिले, तसेच नगरपरिषद सभागृहाने आणखी 10 प्रेक्षणीय स्थळ विकसित करणे कामी केलेला प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना माथेरान येथे येऊन भेट देण्याची विनंती सुध्दा त्यांनी केली आहे.
या वेळी लवकरच माथेरानला येण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासनही आर. ए. राजीव यांनी दिले आहे. या भेटीनंतर त्यांनी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांची भेट घेऊन त्यांना सखाराम तुकाराम पॉईंट आणि रेल्वे लाईनच्या मधील मातीची धूप होणाऱ्या भागास गेबियन वॉल बांधण्यात याव्यात या बाबतीत पत्र देण्यात आले आणि अस्तित्वात असलेली चढण अजून कशी कमी करता येईल याबाबतीतही सूचना करण्यात आल्या.
तसेच एमएमआरडीएच्या टाऊन प्लॅनिंगच्या मुख्य अभियंता उमा यांची देखील भेट घेऊन माथेरान नगरपरिषदेने बी. जे. हॉस्पिटलकरिता दाखल केलेल्या 1 कोटी 38 लाखांचा प्रस्तावास एमएमआरडीएच्या हेरिटेज समितीकडून निधी लवकर उपलब्ध करण्याबाबतीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या कालावधीत एमएमआरडीए अंतर्गत माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक विकासाची कामे करण्यात येणार असून, त्यासाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे, त्या करिता कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. यांसदर्भात कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे देखील विशेष सहकार्य लाभत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यटनमंत्री माननीय आदित्य ठाकरे यांना माथेरानबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्याची विनंती केली आहे. या कॉन्फरन्समुळे निश्चितच अनेक कामे मार्गी लागतील. वैद्यकीय, शैक्षणिक आणि पर्यटनबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. या वेळी नगराध्यक्ष परी सावंत यांच्या सोबत नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांसह अन्य मंडळी उपस्थित होते.