22 लाख मतदार ठरवणार मावळचा खासदार

-लोकसभा निवडणूक ः अधिसूचनेसोबत अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध
-घाटाखालच्या मतदारांची संख्याही वाढली
-2014च्या तुलनेत 2 लाख 73 हजार मतदार वाढले,
-महिला मतदारांची संख्या 1 लाख 43 हजारांनी वाढली
-पनवेलमध्ये सर्वाधिक तर उरणमध्ये सर्वात कमी मतदार

पिंपरी – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदार संघात यंदा मोठी चुरस पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने 2 एप्रिल रोजी प्रसिध्द केली. अधिसूचना प्रसिध्द केल्यानंतर निवडणूक विभागाने अंतिम मतदारयादीही प्रसिध्द केली असून एकूण 22 लाख 27 हजार 633 मतदार खासदार ठरवतील. क्षेत्रफळाने अतिशय मोठा असलेल्या या मतदारासंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. या लोकसभा मतदार संघात सर्वांत मोठा विधानसभा मतदार संघ हा पनवेल असून येथे 5 लाख 14 हजार 902 मतदार आहेत. तर सर्वांत कमी मतदार कर्जत विधानसभात मतदार संघात आहेत. कर्जतमध्ये 2 लाख 75 हजार 480 मतदार आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघाचा नकाशा पाहिल्यास पिंपरी आणि चिंचवड हे मतदार संघ अतिशय लहान दिसून येतात परंतु येथील मतदारसंख्या मात्र अधिक आहे. पनवेलच्या खालोखाल चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 4 लाख 76 हजार 780 मतदार आहेत. विस्तारलेला मतदारसंघ आणि वाढलेले मतदार यामुळे प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवाराला मोठी कसरत करावी लागत आहे. या मतदार संघाची ओळख म्हणजे घाटाखालाचा आणि घाटावरचा भाग अशी होते. पुणे आणि रायगड जिल्ह्यातील तीन-तीन विधानसभा मतदार संघ या लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. दोन्ही बाजूला आता मतदार संख्या जवळपास सारखी होत असल्याने उमेदवारांना या प्रचंड मोठ्या आणि विस्तारलेल्या भागात चांगलीच धावपळ करावी लागत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने 2 एप्रिल रोजी प्रसिध्द केली. अधिसूचना प्रसिध्द केल्यानंतर निवडणूक विभागाने अंतिम मतदारयादीही प्रसिध्द केली असून या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानामध्ये वाढ झाली आहे. एकूण सहा विधासभा मतदारसंघात विस्तारलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी, चिंचवड, मावळ विधासभा मतदारसंघ तर घाटाखालील पनवेल, कर्जत व उरण या सहा विधासभा मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीत घाटाखालील मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने उमेदवारांना विजय मिळवण्यासाठी घाटाखालील मतदारांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागणार आहे.

2 लाख 73 हजार मतदार वाढले

मावळ लोकसभेमध्ये 2014 साली झालेल्या निवडणुकीत 19 लाख 53 हजार 731 मतदार होते. त्यापैकी 11 लाख 73 हजार 949 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 2014 मध्ये मावळमध्ये 60 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 2019 मध्ये 2014 च्या तुलनेत 2 लाख 73 हजार 902 मतदार वाढले आहेत. यामध्ये महिलांची संख्या अधिक असून 1 लाख 43 हजार 559 महिला मतदार वाढल्या आहेत तर पुरुषांचे 1 लाख 30 हजार 311 मतदान वाढले आहे. यावेळी 11 लाख 66 हजार 272 पुरुष मतदार तर महिला 10 लाख 61 हजार 329 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे, या निवडणुकीत महिलांचे मतदानही निर्णयक ठरणार आहे. उमेदवारांना महिलांचे मतदान आपल्याकडे वळवण्यासाठीही विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.