पवनानगर – मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ब्राम्हणोली येथील कॅम्प साईट येथे पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या पर्यटक तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. 1) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
सौरभ मलिक (वय 33, मूळ स्वीन ब्लॉक, जलव्हायु विहार, गौतम बुध्दनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. लोणावळा) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ हा लोणावळा येथील कैवलधाम येथे योगाचे शिक्षण घेत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ व त्याचे तीन मित्र शनिवारी (दि. 31) रात्री पवना धरण परिसरातील “टेंट कॅम्पिंग’वर फिरण्यासाठी आले होते. रात्री कॅम्पिंगवर मुक्काम केला. रविवारी सकाळी ब्राम्हणोली येथील अनाधिकृत पार्किंगवर वाहने उभी करून सौरभसह त्याचे तीन मित्र पवना धरणाच्या पाण्यात उतरले.
काही वेळातच पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ पाण्यात बुडाला. अन्य तीन मित्र पाण्याबाहेर आले. त्यानंतर मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. स्थानिकांनी त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी तात्काळ पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपाचारापूर्वीच सौरभचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.