मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समित ठक्करला नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे. समित ठक्करने ट्वीटरवर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना पेन्ग्विन असे संबोधित केले होते.
२४ ऑक्टोबर रोजी नागपूर पोलिसांनी समित ठक्करला राजकोट मधून ताब्यात घेतले होते. २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केलं असता ५ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यावर शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा समीतला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. तेव्हा या प्रकरणात आणखी तपास शिल्लक असल्याच्या पोलिसांच्या युक्तिवादाला मान्य करत न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
३२ वर्षीय समित ठक्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी नागपूर पोलिसांनी २४ ऑक्टोबर रोजी अटक केली. युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर विरोधात तक्रार केली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.