कामशेत : बेशिस्तीवर वाहनचालकांवर ई-चलनाद्वारे कंट्रोल!

कारवाईचा बडगा : कामशेत शहरात वाहतूक पोलिसांकडून मशीनद्वारे दंड वसुली सुरू

कामशेत – वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ई-चलन पद्धत अधिक अद्ययावत करण्याचा निर्णय राज्यभर घेण्यात आला. मात्र ग्रामीण भागात अद्यापही ई-चलन कार्यप्रणाली फारशी रुजलेली दिसत नाही. ही प्रणाली खेडेगावात पोहोचण्यास वेळ लागला असला तरी पोलीस ही प्रणाली हळूहळू अवगत करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कामशेत पोलीस ठाण्यात ई-चलन मशिन आल्यामुळे वाढत्या बेशिस्त वाहतूक “कंट्रोल’ बसेल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

पोलिसांच्या कारभारात पारदर्शकता यावी, ऑनलाईन व्यवहारांत वाढ व्हावी, तसेच दंड आकारण्यास सुलभता यावी म्हणून सुरू करण्यात आलेली ई-चलन सेवा कामशेत पोलिसांकडून वापरात आली आहे. या प्रणालीनुसार पोलिसांकडून “फतवा’ दिला जात आहे. मागील दोन दिवसांत 40 वाहनचालकांना ई-चलनाद्वारे वसुलीचा “मार्ग’ दाखविला आहे.

ई-चलन कार्यप्रणाली या सुविधेमध्ये वाहनचालकांचे नियमभंगाचे रेकॉर्ड वाहतूक शाखेकडे कायमस्वरुपी राहणार आहे. याशिवाय या रेकॉर्डच्या आधारे संबंधित वाहनचालकांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दंड वसुली करताना वाहतूक पोलिसांकडे कोणतेही पावती पुस्तक नसल्यामुळे तसेच वाहन चालकांचे छायाचित्र घेण्यात येणार असल्यामुळे वाद टाळून कारवाईबाबत पारदर्शकता आणि वेग येणार आहे. याशिवाय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेशिस्त वाहतूक कमी होईल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

कामशेत पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मशिनच्या वापरासंदर्भात नुकतीच दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला वाहतूक विभागाचे फौजदार दत्तात्रय खंडागळे हजर होते. या ई-चलन मशीनमुळे दररोज किती दंड वसूल केला याचे रेकॉर्ड ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे वाहतूक पोलिसांचे काम सुकर होणार आहे. याशिवाय एखादा वाहनचालक पैसे नाही, असे म्हणून हुज्जत घालत असल्यास दंड हा त्याच्या वाहनावर जमा होऊन तो भविष्यात त्याच्याकडून जमा केला जाऊ शकतो.

ई-चलन कार्यप्रणालीविषयी…

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध ऑनलाईन कारवाई करणे, वाहनाचे छायाचित्र काढून त्याचा पुरावा म्हणून वापर करणे, दंड कपातीची माहिती वाहनचालकाच्या मोबाईलवर “एसएमएस’द्वारे पाठविणे, दंड जागेवर डेबिट किंवा क्रेडीट कार्डद्वारे भरता यावा, म्हणून कर्मचाऱ्यांकडे स्वाइप मशिन्स, व्होडाफोन कंपनीच्या आऊटलेटमध्येही दंडाची रक्‍कम भरता येणार, पेंडिंग दंडाबाबत वाहन चालकाला ऑनलाईन पेमेंट सुविधा, कार्यालयात येऊन दंड भरण्याची सुविधा, कर्मचाऱ्याकडे असणाऱ्या स्मार्टफोनमध्येच स्वाईप करण्याची सुविधा, पूर्णपणे पेपरलेस व कॅशलेस सुविधा देऊन पारदर्शक कारवाई करता येणार आहे.

ई-चलन मशीनमध्ये एखाद्या वाहनाचा क्रमांक टाकल्यानंतर त्या वाहनाची संपूर्ण माहिती येते. याआधी या वाहनाने कोणता कोणत्याही स्वरूपाचा दंड चुकवला असेल, तर या मशीनमध्ये त्याची संपूर्ण “हिस्ट्री’ दिसतो. या मशीनमध्ये वाहन चालकाचा ड्रायव्हिंग लायसेन्स क्रमांक व मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर वाहन चालकाला दंडाची पावती मेसेज स्वरुपात जाते. यामुळे वाहनचालकांना दंडाची ई-पावती मिळते.

शनिवारी (दि. 13) सकाळी ई-चलन मशिनद्वारे वाहन चालकांकडून दंड आकारणी सुरू होती. यावेळी वाहतूक पोलीस दत्तात्रय खंडागळे, हनमंत वाघमारे यांच्यासह वार्डन किसन बोंबले, गणेश गव्हाणे, नितेश चव्हाण, विकास साळवे आदी महामार्गावरील बेशिस्त आणि नियमबाह्य वाहनांवर कारवाई करीत होते.

“कामशेत पोलीस ठाण्याकडे नुकतीच ई-चलन मशिन प्राप्त झाली आहे. पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकी, विनाहेल्मेट वाहनचालक, अवैध प्रवासी वाहतूक, अवजड वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मागील दोन दिवसांत 40 वाहनांवर ई-चलनद्वारे कारवाई केली आहे. या कार्यपद्धतीमुळे पारदर्शकता आली असून, आगामी काळातही कारवाई वेग घेईल.
– दत्तात्रय खंडागळे, सहायक फौजदार, वाहतूक विभाग, कामशेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.