कोलंबो – यॉर्कर किंग लसित मलिंगा याने राउंड आर्म ऍक्शनने गोलंदाजी करत जागतिक क्रिकेटला आश्चर्यात टाकले होते. त्यानेच श्रीलंकेच्या गोलंदाजीचा मुख्य भार वाहिला होता. आता त्यांचा मथिशा परिताना हुबेहूब मलिंगाच्या गोलंदाजी शैलीने गोलंदाजी करतो, त्यामुळे श्रीलंका क्रिकेट विश्वाला त्याचा वारसदार मिळाला आहे, असे बोलले जात आहे.
सध्या वेस्ट इंडीजमध्ये 19 वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत श्रीलंकेच्या मथिशाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पतिराना देखील राउंड आर्म गोलंदाजी करतो. आयसीसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मथीशा पतिरानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मथीशा भारताविरुद्धच्या गेल्या वर्षी 19 वर्षाखालील सामन्यात पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्याने यशस्वी जयस्वालला 175 किमी प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने चेंडू टाकला होता. पाकिस्तानच्या शोएब अख्तरने 2003 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला होता.