आग्रा – घरगुती हिंसाचाराला कंटाळून एका विवाहीतने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंदुकीच्या सहाय्याने छातीत गोळी मारत या महिलेने आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील विद्यापुराम कॉलनीत हा प्रकार घडला आहे. आत्महत्येपुर्वी या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन पानांचे पत्र लिहिले आहे.
मोना द्विवेदी असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. अंबुज द्विवेदी व पकंज द्विवेदी असे आरोपी दीरांची नावे आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, विद्यापुराम कॉलनीत राहणाऱ्या मोना यांनी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गावठी बंदुकीतून गोळी मारत आत्महत्या केली. गोळी झाडल्याचा आवाज येताच घरातील अन्य एक महिलेने मोना यांच्या रुमकडे धाव घेतली. घरातील अन्य सदस्यांनी रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा मोना रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. जखमी मोना यांना घरातील सदस्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांच्या मृत्यू झाला.
आत्महत्या करण्यापुर्वी मोना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन पानांचे पत्र लिहिले आहे, हे पत्र तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाइल फोनवर पाठवून आत्महत्या केली आहे. आता हे पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते असून मृत मोना यांनी या पत्राच्या माध्यमातून घरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष्य वेधले आहे.
दरम्यान, सुसाईड नोटमध्ये ‘आपण एका गरीब कुटुंबातील असल्याने संबंधित दोन्ही दीरांनी मला अनेकदा मारहाण केली आहे. मी लहान असताना माझ्या आईचं निधन झालं. तर माझ्या वडिलांना दारुचं व्यसन आहे. त्यामुळे कुटुंबाचा कोणताही आधार नसल्यानं मी मागील कित्येक वर्षांपासून सासरच्या मंडळींचा त्रास सहन करत आहे. मागील काही वर्षांत त्यांनी मला अनेकदा मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे. असेही लिहले आहे.