पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात बाजार समितीच्या मार्केट यार्डातील मुख्य आवारातील सर्व बाजारांसह चारही उपबाजार बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी दिली. आडते, कामगार, शेतकरी आणि सर्व घटकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यामध्ये 13 ते 23 जुलै या कालावधीत शहरात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बाजार समितीचे सर्व बाजार बंद राहणार आहेत.
याविषयी देशमुख म्हणाले, पूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीतही बाजार सुरू असायचा. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. गुळ-भुसार, फळे, भाजीपाला आणि फुले विभाग बंद राहणार आहे.