पिरंगुट(प्रतिनिधी) – लवळे (ता. मुळशी) येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटलमध्ये खास मुळशीकरांसाठी तीस बेड राखीव करून मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातील बाधित रूग्णांवरही मोफत उपचार होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद सिम्बॉयोसिस हॉस्पिटलसोबत पाच कोटी रुपयांचा करार करणार असल्याची माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी सभापती महादेव कोंढरे यांनी दिली.
नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी सभापती महादेव कोंढरे, माजी सभापती रविंद्र कंधारे आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर सिम्बॉयोसिस हॉस्पिटल येथे पुणे शहरातील बाधित रूग्णांचे बील पुणे महानगरपालिका अदा करते. त्याच धर्तीवर मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातील बाधित रूग्णांवरही मोफत उपचार होण्यासाठी जिल्हा परिषदेने काहीतरी तरतूद करावी अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सिम्बॉयोसिस हॉस्पिटल बरोबर पाच कोटी रूपयांचा करार करतो असे आश्वासन यावेळी दिले.