शिरूर( प्रतिनिधी) : शिरूर शहरातील कोविड केअर सेंटर येथून कोरोना तपासणीसाठी पाठवलेले 26 पैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .शिरूर तालुक्यात आज नव्याने आणखी चार असे मिळून 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यात कोरोना बाधितांचे आकडा आता 129 एवढा झाला आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे 1, रांजणगाव गणपती 1, सणसवाडी 1, शिक्रापूर 1, कोरेगाव भीमा 1 असे पाच गावात मिळून पाच कोरोना बाधित रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
शिरूर शहरातील संभाजी नगर हुडको वसाहत येथे 53 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली असून, त्याच्या संपर्कात आलेले सोनार आळी येथील 13, तर हुडको वसाहत येथील 44 असे एकूण 57 जण होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती नगरपालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे. तसेच हुडको वसाहतीतील लेन नंबर 3 कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
शिरूर तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे शिरूर तालुका आता कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, सतत हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, तोंडाला सतत हात लावू नये, बाहेर गेल्यावर कुठल्याही वस्तूला हात लावू नये, सोशल डिस्टन्स पाळावे यासह शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे हे असे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.