नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तहसील कार्यालयातील कुणबी नोंदी आढळलेल्या कागदपत्रांची मोडी लिपीचे मराठी भाषांतर करण्यासाठी मोडी लिपी वाचकांना राज्य शासनाने तात्काळ मानधन देऊन प्रसिद्ध माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावे. जेणेकरून सर्वसामान्य मराठा नागरिकांची फसवणूक होणार नाही.
मोडी लिपी वाचकांना तहसीलदार कार्यालयात बसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांच्या वतीने तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा मंगळवारी (दि.19) तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समाजाचे जुन्नर तालुका समन्वयकांनी निवेदनाद्वारे दिला आहे
यावेळी तहसीलदार सबनीस यांनी समाजाच्या मागण्यांचा तात्काळ विचार करू असे आश्वासन दिले. यावेळी जयेश खांडगे, प्रवीण डोंगरे, साईनाथ ढमढेरे, राजेंद्र ढोमसे, सुशांत दिवटे, अनिल देशपांडे उपस्थित होते.