नारायणगाव, (वार्ताहर) – वारुळवाडी (ता. जुन्नर) परिसरातील आनंदवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या उद्यानामध्ये दुर्मिळ गव्हाणी जातीचे दुर्मिळ घुबड विक्रम भुजबळ यांना आढळून आले आहे
दुर्मिळ जातीचे घुबड बर्याच वेळ एका ठिकाणी बसून असल्यामुळे त्याला इजा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज करण्यात त्यानंतर वारुळवाडीचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ, वन विभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी जिल्हा परिषद पशू वैद्यकीय अधिकारी शुभम राणे यांना बोलावून दुर्मिळ जातीच्या गव्हाणी घुबडावर वैद्यकीय उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
ओतूर (ता. जुन्नर) येथील पक्षीनिरीक्षक विजय वायाळ म्हणाले की, गव्हाणी घुबड पक्षी साधारणपणे 36 सें. मी.आकाराचा आहे. पाठीकडून सोनेरी-बदामी आणि राखाडी रंगाचा असतो. त्यावर काळ्या-पांढर्या रंगाचे पट्टे असलेला व पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात.
डोके गोलसर बदामी आकाराचे असते. चेहर्याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. सर्वच घुबड प्रजाती ह्या निशाचर असतात.गव्हाणी घुबड संपूर्ण भारतभर तसेच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे.
भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. घुबड पक्षी एकट्याने किंवा जोडीने जुन्या इमारती, किल्ले, कडेकपारी, शेतीचे प्रदेश येथे राहणे पसंत करतात.उंदीर, घुशी, सरडे, पाली हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. जुन्या-पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या ढोलीत काड्या वापरून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते.
घरट्यांजवळ दिवसा सावली येऊ शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते. एकच घरटे वर्षानुवर्षे वापरण्याची सवय या पक्ष्यांना असते. मादी एकावेळी पांढर्या रंगाची गोलसर 4 ते 7 अंडी देते.