पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील आमदार नीलेश लंके व मनसेला रामराम ठोकलेले वसंत मोरे यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. हे दोघेही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असली, तरी या दोघांनीही पक्ष प्रवेशाबाबत संभ्रम ठेवल्याचे दिसून येत आहे.
अहमदनगर येथील पारनेर मधील आमदार नीलेश लंके यांच्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पत्रकार परिषदही झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार नीलेश लंके आदी उपस्थित होते.
दरम्यान, निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याने त्यांनी जर चुकीची भूमिका घेतली, तर त्यांना आमदारकी गमवावी लागेल; अन्यथा निलंबित होतील, असा इशारा अजित पवार यांनी सकाळीच दिला होता. त्यानंतरही लंके यांनी दुपारी शरद पवार यांची पुण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतली. लंके यांच्या आधी वसंत मोरे पक्ष कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली व पक्ष प्रवेश न करताच ते निघून गेले. त्यानंतर नीलेश लंके पक्ष कार्यालयात दाखल झाले. त्यांचीही शरद पवार यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली.
मात्र, या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कोणतीही ठोस भुमिका जाहीर केली नाही. तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी? असा प्रश्न विचारला असता, पवार साहेब सांगतील तो आदेश मान्य असेल, असे सूचक विधान लंके यांनी केले.
माझी विचारधारा आणि पक्ष एकच आहे. साहेबांची विचारधारा सोडणार नाही, असेही लंके यांनी नमूद केले. मात्र, लंके यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेश केलाच नाही. दरम्यान, लंके यांची पक्ष प्रवेशाबाबत केवळ औपचारिकताच बाकी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मी शरद पवारांच्या विचारधारेबरोबरच आहे. लहानपणापासून शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि विचारांचा चाहता आहे. करोना काळात शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले होते. ज्या काळात कुटुबांतील लोक एकमेकांना विचारत नव्हते, त्या काळात शरद पवार यांच्या नावाने समाजसेवा करत होतो. त्याच काळात जे अनुभव आले.
त्याआधारावर ‘मी अनुभवलेला कोविड’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा होती. त्यासाठी इथे आलो आहे, अशी भूमिका लंके यांनी मांडली.
लंके यांना आवश्यक ते सहकार्य – शरद पवार
पारनेर तालुक्यातील अतिशय कष्टाळू आणि मेहनती कार्यकर्ता म्हणून नीलेश लंके यांचे नाव घेतले जाते. ते आमच्या कार्यालयात आले. त्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. यापुढे कुठेही त्यांना मदत लागली, तर त्यांना सहकार्य करणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. वसंत मोरे यांच्याशी राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मला कोणीही भेटले म्हणून खुलासा करत बसू का, असेही पवार या वेळी म्हणाले.