शहरात स्वच्छता, सुशोभिकरणास प्राधान्य; कचऱ्यापासून खतनिर्मितीचे उद्दिष्ट
फलटण – शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले. शहर परिसरातील वाढते औद्योगिकीकरण, शिक्षणाच्या सुविधा आणि लोकसंख्या वाढ विचारात घेता नागरी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी कमिन्सच्या सहकार्याने काही प्रकल्प राबविण्यात येत आहेत, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
रामराजे यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या सभागृहात “स्वच्छ सर्व्हेक्षण 2020′ अभियानंतर्गत कमिन्स इंडिया व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज झाली.
नगराध्यक्ष सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, कमिन्सच्या सोशल कार्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी विभागाच्या व्यवस्थापक संगीता गुप्ते, आरोहणम् संस्थेच्या सरोज बडगुजर, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, फलटण परिक्षेत्र वनाधिकारी मारुती निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी.दराडे, उपअभियंता महेश नामदे, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे, उपअभियंता योगेश सावंत, फलटणचे उपअभियंता श्रीरंग ठवरे, भूमी अभिलेख उपअधीक्षक शिल्पा जोग व नगरसेवक उपस्थित होते.
सार्वजनिक शौचालये, रिंग रोडवर करण्यात आलेले रस्ते दुभाजक, बाणगंगा नदीवरील पुलापासून गिरवी नाक्यापर्यंतच्या रस्ता दुभाजकाचे सुशोभिकरण, वन विभागाच्या सहकार्याने गिरवी नाक्यावर करण्यात आलेल्या बागेचे पुनरुज्जीवन, अधिकारगृह आवारातील बागांचे नूतनीकरण, परिसराचे सुशोभिकरण, कचरा डेपोत साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्ड्यांची दुरुस्ती व प्रत्यक्ष खतनिर्मिती, नीरा उजवा कालवा कॉलनीलगतच्या खुल्या जागेत बाग करणे, नीरा उजवा कालव्याच्या शहरातून जाणाऱ्या भागाचे सुशोभिकरण आदी कामे कमिन्स व नगरपरिषद यांच्या सहभागाने हाती घेण्यात येत असल्याची माहिती काटकर यांनी दिली.
सार्वजनिक शौचालयांमध्ये वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांची स्वच्छता, दुरुस्ती व देखभाल करण्याचे संगीता गुप्ते यांनी मान्य केले. पहिल्या टप्प्यात 15 शौचालयांना वीज व पाण्याची सुविधा देण्याचे ठरविण्यात आले. अधिकारगृह परिसरातील स्वच्छतागृहाची दुरुस्ती, वाहनतळ आणि बागांचे सुशोभिकरण लवकरच करण्याची ग्वाही गुप्ते यांनी दिली.
नीरा उजवा कालवा विभागाच्या कर्मचारी वसाहतीलगतच्या खुल्या जागेसंदर्भातील वादात न पडता पाटबंधारे व वन विभागाने तेथे बगीचा तयार करण्यास संमती दिली असून कमिन्सच्या माध्यमातून या कामाला सुरुवात होणार आहे. शहरात स्वच्छता अभियान गतीने सुरू असून प्रभागनिहाय स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा भाग म्हणून घंटागाड्यांचे सुशोभिकरण, पाण्याच्या टाक्यांची रंगरंगोटी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.