ठाणे – मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर कुठल्याही प्रकारच्या अन्याय केला जाणार नाही. यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. मागासवर्ग आयोगही त्यावर काम करत आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांचा विरोध नाही. यासंदर्भात माझी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला आहे. तसेच त्यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर आरक्षणाच्या विषयावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाद चालू आहे. या सर्व गोष्टींवर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना आपण काढलेली नाही. ही अधिसूचना 1967 साली काढण्यात आली होती. तेव्हापासून तिचा अवलंब केला जात आहे. छगन भुजबळांची एवढीच मागणी आहे की, ओबीसींचे आरक्षण कमी होऊ नये. हीच भूमिका सरकारचीदेखील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.