प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -“गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेवर असलेल्या लष्कराच्या छावणीतही दुमदुमला. भारतीय लष्करातील 1 मराठा बटालियनच्या सैनिकांनी सीमेवर गणेशोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीच्या श्रींच्या प्रतिकात्मक मूर्तीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. दहीहंडीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ही दोन फुटी मूर्ती सैनिकांना देण्यात आली होती.
भारतीय लष्करातील 1 मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा मागील वर्षी व्यक्त केली होती. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठवले होते. त्यानुसार ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रींची हुबेहुब 2 फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य करत बटालियनला मागील वर्षी व यावर्षी देखील मूर्ती सुपूर्द करण्यात आली. लष्करातील 1 मराठा बटालियनचे बालाजी कदम यांनी याकरिता समन्वयाचे काम केले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी मंगलमूर्ती मोरयाचा गजर करीत सैनिकांनी श्रींची प्रतिष्ठापना केली. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करते. यंदा देखील पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.