मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता घसरली

नवी दिल्ली: एप्रिल महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता घसरली असल्याची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे उद्योगक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रिझर्व्ह बॅंकेने दोन वेळा व्याजदरात कपात करूनही खासगी गुंतवणूक वाढत नाही.

एप्रिल महिन्यासाठीचा मॅन्युफॅक्‍चरिंग संदर्भातील पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्‍स म्हणजे पीएमआय केवळ 51.8 भरला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 52.6 इतका होता. देशातील विविध कंपन्यांतील पर्चेसिंग मॅनेजरच्या ऑर्डरच्या आधारावर हा निर्देशांक तयार केला जातो.

यावरून मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रातील घडामोडींचा अंदाज घेतला जातो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे हा निर्देशांक 50 च्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारीकरणाच्या मार्गावर असल्याचे समजले जाते. गेल्या 21 आठवड्यांपासून हा निर्देशांक 50 च्या वर आहे. मात्र, त्यात निश्‍चितपणे वाढ न होता हा निर्देशांक कमी-जास्त होत आहे. एप्रिलनंतर देशभरात निवडणुकांचे वारे आहेत. त्यातल्या त्यात महागाईची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार महागाई वाढत जाण्याची लक्षणे आहेत. तसे झाले तर रिझर्व्ह बॅंक शिथिल पतधोरण जाहीर करणार नाही. त्याचा औद्योगिक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

गेल्या आठवड्यात पायाभूत सुविधा क्षेत्राच्या उत्पादकतेत अत्यल्प वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. त्याचबरोबर सेवा क्षेत्राचा पीएमआयही वाढला नसल्याची माहिती जारी करण्यात आली होती. आता मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राचा पीएमआयही वाढलेला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे. जनतेची क्रयशक्ती वाढल्याशिवाय उत्पादकता वाढणार नाही, असे विश्‍लेषकांना वाटते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.