Manoj Jarange Patil – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी करत असलेले उपोषण सध्या स्थगित केले आहे. त्यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शुक्रवारीच जरांगे उपचार पूर्ण करून जालन्यातील गावी परतले. परंतु, प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना जिल्हा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या छातीत दुखू लागले आहे. हा त्रास त्यांना या पूर्वी कधीही झाला नव्हता. मात्र, अचानक छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांकडून त्यांना इंजेक्शन आणि सलाईन लावण्यात आले.
पण छातीत दुखणे हे गंभीर असल्याने आणि जरांगे उपचाराला साथही देत नसल्याने डॉक्टरांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. इथे केवळ प्राथमिक उपचार होतील. त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याची गरज आहे. त्यांचे सध्या पल्स चांगले आहेत.
मात्र छातीत कशामुळे दुखत आहे, याची माहिती पुढील उपचारानंतर कळेल. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलवावे लागेल, अशी प्रतिक्रिया उपचार करणाऱ्या डॉ. विष्णू सकुंडे यांनी दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या या माहितीनंतर मराठा समाजातील आंदोलकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.