पुणे – राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येत असलेली मांजरी पाणी पुरवठा योजना आता पुणे महापालिकेच्या ताब्यात आली आहे. मांजरी गाव 2021 मध्ये महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्याने संबंधित योजना महापालिकेकडे आली आहे. योजनेचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु, मांजरी योजनेत विद्युत देयकासाठी कोणतीही तरतूद नसल्याने प्राधिकरणाकडून विद्युत देयके भरता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर, योजना मनपाच्या ताब्यात गेल्यानंतर या भागातील पाणीपुरवठाच बंद झाला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून “मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ या अंतर्गत मांजरी पाणी पुरवठा योजनेच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. सध्या, योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे, आत्तापर्यंत योजनेचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2021 मध्ये मांजरी गाव हे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित योजना देखील महापालिकेकडे देण्याचे निश्चित झाले.
दरम्यान, सदर प्रक्रियेपूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता पी.सी. भांडेकर, कार्यकारी अभियंता सुभाष पावरा यांनी मांजरी येथे प्रत्यक्ष पाहणी केली. तर, यापूर्वी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी या योजनेबाबत पाठपुरावा केल्याचा दावा केला होता.