नवी दिल्ली – मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने सिसोदिया यांच्याविरोधात आज मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने ईडीकडे महत्त्वाची कागदपत्रे सोपवली होती. त्यानंतर ईडीने मनिष सिसोदिया यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
सीबीआयने मद्य घोटाळ्याशी संबंधित एफआयआर आणि अन्य दस्ताऐवजांची माहिती ईडीला सोपवली होती. याआधी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरोधात लुक आउट सर्कुलर जारी केले होते. यामध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या नावाचा समावेश आहे.
मद्य घोटाळ्यात शुक्रवारी सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय इतरही सरकारी अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी सुरू होती. जवळपास 14 तास छापेमारी सुरू होती. या छाप्यात सीबीआयने काही महत्त्वाचे दस्ताऐवज जप्त केले होते. यातील काही दस्ताऐवज अतिशय गोपनीय होते.
हे दस्ताऐवज सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी असता कामा नये. सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या कारची तपासणीदेखील केली होती. सीबीआयने सिसोदिया यांचा फोन, लॅपटॉप जप्त केला. त्याशिवाय त्यांचा ई-मेल डेटादेखील सुरक्षित ठेवला आहे.