नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे अटकेतील नेते मनीष सिसोदिया यांच्याकडून खोटा कबुली जबाब घेण्यासाठी त्यांना काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा दबाव आणला जात असून, त्यासाठी त्यांचा कोठडीत छळही केला जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी हा आरोप केला आहे.
उत्पादन शुल्क धोरणाच्या संबंधात सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क धोरणाच्या संबंधात तज्ज्ञांच्या समितीने जी मते व्यक्त केली होती त्याचा अहवाल असलेली फाईल अजून सापडत नसून ती फार हुडकून काढण्यासाठी आम्ही सिसोदियांकडे चौकशी करीत आहोत आणि त्यासाठीच आम्हाला त्यांची कोठडी वाढवून पाहिजे आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
या संबंधात आपचे प्रवक्ते भारद्वाज यांनी म्हटले आहे की, सिसोदिया यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले असून, त्यांच्याकडून कागदपत्रांवर व कबुली जबाबावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांना धमकावले जात आहे. याआधीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापे घातले होते, पण त्यांच्या या छाप्यात सीबीआय किंवा ईडीला काहीही सापडले नाही, असे ते म्हणाले.
सिसोदिया यांच्या सर्वच जवळच्या नातेवाईकांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. सिसोदियांची कोठडीत सतत आठ ते नऊ तास चौकशी केली जात असून, त्यांना तेच तेच प्रश्न विचारून त्यांचा मानसिक छळही केला जात आहे, असेही भारद्वाज यांनी म्हटले आहे.