नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी आज अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि तिहारच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करताना सांगितले की, केजरीवाल यांना तुरुंगात इन्सुलिन मिळू नये यासाठी कट रचला जात आहे. केजरीवाल यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेऊन इन्सुलिन सुरू करायचे आहे, असा अर्ज राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केला होता.
ईडी आणि तिहार प्रशासनाने या अर्जाला विरोध केला आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिनची गरज नसल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांना कशाची गरज आहे याबद्दल त्यांनी एम्सच्या डॉक्टरांशी चर्चा केली आहे, असा तिहार तुरूंग प्रशासनाचा दावा आहे असे आतिशी यांनी निदर्शनाला आणून दिले.
त्या म्हणाल्या की, आज मला एम्सच्या डॉक्टरांबद्दल सत्य सांगायचे आहे. जेव्हा ईडी आणि तिहार प्रशासनाने एम्सच्या डॉक्टरांची बाजू मांडली, तेव्हा त्यांनी केजरीवाल यांना एम्सच्या कोणत्याही डॉक्टरांशी सल्लामसलत करू दिली नाही. दुसरे म्हणजे तिहार प्रशासनाने न्यायालयाला सांगितले की, एम्सच्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरांनी केजरीवाल यांच्यासाठी आहाराचा तक्ता तयार केला आहे आणि जर त्यांनी ते पाळले तर त्यांना इन्सुलिनची गरज भासणार नाही, पण हा डायट चार्ट एम्सच्या आहारतज्ज्ञांनी बनवला आहे, तो कोणत्याही मधुमेही तज्ज्ञांनी बनवलेला नाही असेहीआतिशी यांनी नमूद केले.
पुढे, तिहारच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेला आहार चार्ट दाखवत, आतिशीनी नमूद केले की एम्सच्या आहारतज्ञांनी ते बनवले आहे कोणत्याही डॉक्टरांनी किंवा डायबेटोलॉजिस्टने हा डाएट चार्ट बनवलेला नाही, या डाएट चार्टवर स्वाक्षरी करणारे डॉक्टर मधुमेहतज्ज्ञ नाहीत. येथे न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि केजरीवाल यांना इन्सुलिन मिळू नये यासाठी संपूर्ण षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप आतिशी यांनी केला.