नवी दिल्ली :- गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ मणिपूर जळत असतानाही त्या विषयी बेफिकीरी दाखवल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज दिल्लीत जंतरमंतर येथे निदर्शने केली.
या निदर्शनात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पुणे विभागातील सुमारे शंभरहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. “याहून मोलाचे काय? आमचे जीव की मते?” असे संदेश असलेले पोस्टर घेऊन या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. केंद्र आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याविरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनाला पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. राष्ट्रवादी तर्फे राजधानी दिल्लीत मणिपुरप्रकरणात झालेली हीं पहिलीच निदर्शने होती.