पळसदेव, (वार्ताहर)- इंदापूर तालुक्यात 2024-25 या आर्थिक वर्षाचे गावाचे विकास आराखडे करताना प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांच्या एकूण तरतुदीचा 30 टक्के बांधित निधीच्या रकमेतून पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळीत वाढ होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, आशा सक्त सूचना सरपंच व ग्रामसेवकांना करण्यात आल्या आहेत. इंदापूर तालुक्यातून सुमारे 1 कोटी 37 लाख रुपयाची तरतूद रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामासाठी झाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली.
अटल भूजल योजनेअंतर्गत तालुक्यातील 3 गावांचा समावेश झाला यामध्ये सपकळवाडी, तावशी व हिंगणेवाडीचा समावेश झाला आहे. ही इंदापूरसारख्या संपन्न तालुक्यासाठी विचार करायला लावणारी बाब आहे. भविष्य काळात यामध्ये वाढ होऊ नये. व तालुक्यातील गावे जलसमृद्ध व्हावी व ती कायम जलसमृद्ध राहावीत यासाठी पाणी जमिनीत मुरवण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवण्याची गरज आहे.
सध्या जलजीवन मिशन सुरू आहे; मात्र या योजनेच्या विहिरींना भविष्य काळात पाणी कमी पडून गावच्या पाणी योजना बंद पडू नयेत. अन्यथा जलजीवन मिशन योजनेसाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा शासनाचा निधी वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत बळकटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी जागृक असणे आवश्यक आहे .
पाच गावांचे आराखडे अपलोडिंग बाकी
इंदापूर तालुक्यातील 116 ग्रामपंचातींपैकी 80 ग्रामपंचातींनी 1 कोटी 37 लाख रुपयांची तरतूद रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामासाठी केली आहे. बाकी 31 गावांनी पंचायत समितीच्या परस्परच आराखडे अपलोड केले आहेत. त्या ग्रामसेवकांना देखील बांधित निधीतून जलस्त्रोत बळकटीकरण या बाबींसाठी ठोस काम करावे, याबाबत सूचना करणार असल्याचे परीट यांनी सांगितले. तर 5 गावाचे आराखडे अद्याप अपलोड करणे बाकी आहेत.