सातारा – सैदापूर (ता. कराड) येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील (वय 37) आणि डिस्कळ, ता. खटाव येथील तलाठी जय रामदास बर्गे (वय 32, रा. सुभाषनगर, कोरेगाव) यांच्यावर लाचखोरीप्रकरणी सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी केलेल्या दोन कारवायांमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. यातील सैदापूरचा मंडलाधिकारी पाटील याच्यावतीने तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना खासगी व्यक्तीस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर संशयित विनायक पाटील पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आली होती. त्याबाबतच्या सुनावणीवर आदेश काढून तशी नोंद धरण्याकरिता आणि सातबारा उतारा देण्याकरिता विनायक पाटीलने 15 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती खाजगी व्यक्ती मंगेश उत्तम गायकवाड (वय 32, रा. सुपने, ता. कराड) याने तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डिस्कळ, ता. खटाव येथे केलेल्या कारवाईत तलाठी जय बर्गे याला लाच घेताना पकडण्यात आले.
यातील तक्रारदाराच्या जमिनीची खातेफोड करून, सातबारा उतारा देण्याकरिता तलाठी बर्गे याने आधी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी दहा हजार रुपये त्याने आधीच स्वीकारले होते. त्यानंतर राहिलेल्या दहा हजार रुपयांपैकी पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता बर्गे याने शेजारील अजय बाळकृष्ण शिपटे यांच्या झेरॉक्सच्या दुकानात ठेवायला तक्रारदाला सांगितले. तक्रारदाराने ही रक्कम शिपटे यांच्या दुकानात ठेवली. ही रक्कम घेण्यासाठी बर्गे थोड्याच वेळात दुकानात आला. त्याच वेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सातारच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सचिन राऊत, पोलीस नाईक राजपुरे, गणेश ताटे, नीलेश येवले व महिला पोलीस नाईक जाधव यांनी या कारवाया केल्या.