लंडन : ब्रिटनमधील मॅनचेस्टर शहरातील अत्यंत गजबजलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये शुक्रवारी झालेल्या एका चाकू हल्ल्यामध्ये पाच जणांन भोसकण्यात आले. दहशतवादविरोधी अधिकाऱ्यांना या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. घटनेचे स्थान आणि स्वरूप लक्षात घेता एका व्यक्तीला संशयावरून अटक करण्यात आली आहे आणि तज्ज्ञ् अधिकारी तपास करत आहेत, असे ग्रेटर मॅंचेस्टर पोलिसांनी सांगितले.
मॅंचेस्टर अरेनाच्या आसपास हे शॉपिंग सेंटर आहे. “इसिस’च्या दहशतवाद्यांनी 2017 मध्ये एरियाना ग्रॅंड मैफिलीवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात 22 जण ठार झाले होते.
पाच जणांवर चाकूने वार झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. तथापि, या भयंकर घटनेमागील हेतूबद्दल आपण सर्व शक्यता खुल्या ठेवत असल्याचे पोलिस दलाने म्हटले आहे.
पोलिसांनी शॉपिंग सेंटरचा ताबा घेतल्यावर सर्व शॉपिंग सेंटर रिकामे करण्यात आले. संशयावरून चाळीशीतला एक माणूस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या घटनेबद्दल धक्का बसल्याचे म्हटले अहे.