दुबई – दक्षिण आफ्रिका संघाचा इंग्लंड दौरा व त्याचे वेळापत्रक आता भारत व इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या पुनर्आयोजनाच्या आड येत आहे. त्यामुळे भारत व इंग्लंड यांच्यातील रद्द करण्यात आलेली मॅंचेस्टरला होणार असलेली पाचवी कसोटी आता होणारच नसल्याचे बोलले जात आहे.
या कसोटीच्या आयोजनासाठी जे वेळापत्रक तयार करण्यावरून चर्चा सुरु होती त्यावर इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने हा खुलासा केला आहे. दक्षिण आफ्रिका संघ याच कालावधीत इंग्लंडच्या दौऱ्यावर असेल व पाचव्या कसोटी सामन्याच्या आयोजनासाठी त्यानुसार दिवस निश्चित करणे शक्य नसल्याचे इंग्लंड मंडळाने सांगितले आहे.
रवी शास्त्री यांच्यासह अन्य तीन जणांना करोनाची बाधा झाल्याने हा कसोटी सामना रद्द केला गेला होता. त्याचे फेर आयोजन करण्याबाबत चर्चाही सुरु होती. इंग्लंड मंडळाने बीसीसीआयशी चर्चा केलेली नाही.
त्यातच भारतीय संघ पुढील वर्षी 1 ते 14 जुलै दरम्यान मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून त्यावेळीच या रद्द झालेल्या कसोटीचे आयोजन करणे शक्य होणार का याबाबत चाचपणी सुरु होती.