बेसिंगस्टोक – सध्या पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत थंडीचा कहर सुरु आहे कारण उत्तर भारतासह जम्मू-काश्मीरमधले तापमान शून्याच्या खाली जाताना दिसत आहे. अशीच अवस्था उत्तर गोलार्धातील युरोपियन देशांमध्ये झालेली असून इंग्लंडच्या उत्तर भागातील बेसिंगस्टोक येथे गेले आठ दिवस सलग हिमवृष्टी होत असून सर्व व्यवहार थंड पडल्याचे दिसून येत आहे.
गेली अनेक वर्षे इंग्लंडमध्ये स्थायिक असलेले कॉप्युटर अभियंते आणि दै. प्रभातचे नियमित वाचक संदीप शहाणे यांनी ते रहात असलेल्या बेसिंगस्टोक येथील हिमवृष्टीची छायाचित्रे पाठवली आहेत. बेसिंगस्टोक हे शहर लंडनच्या उत्तरेला सुमारे 75 किमी अंतरावर असून लंडनहून तेथे जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात.
सध्या बेसिंगस्टोक येथील तापमान उणे 3 ते उणे 7 दरम्यान जात असून, आज बुधवारी थोडेसे सूर्यदर्शन झाल्याचे शहाणे यांनी सांगितले. सूर्य आकाशात चमकताना दिसत असला, तरी जवळच्या मेणबत्तीची ऊब त्यापेक्षा जास्त असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
इंग्लंडच्या हॅम्पशायर परगण्यामधील बेसिंगस्टोक येथील थंडीचा प्रकोप हा स्कॉटलंड आणि मॅन्चेस्टर येथील थंडीपेक्षा अधिक असल्याचे मानले जात आहे; कारण पूर्वेकडून येणारे अतिथंड वारे दैनंदिन तापमान घटवण्यात मोठा हातभार लावत आहेत. आणखी काही दिवस तापमान असेच खाली राहिले तर करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.
एकंदरीत काय तर, जम्मू-काश्मीरप्रमाणे उत्तर इंग्लंड आणि युरोपची हवा अतिथंड होत असल्याने जवळ येत असलेल्या व्हॅलेनटाईन दिनानिमित्त रोमॅंटीक वातावरण निर्माण होत असल्याने तरुणाईमध्ये आनंदाचे वातावरण आहे.