मंचर -मंचर शहरात करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने मंगळवार (दि. 7) ते गुरुवार (दि. 16) पर्यंत मंचर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. शहरात गेल्या 15 दिवसांत 6 करोनाबाधित रुग्ण आले आहेत. यामुळे प्रांताधिकारी जितेंद्र डुडी यांनी शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याने कलम 144 नुसार नागरिकांच्या हालचालीवर पूर्णपणे बंदी असेल.
तातडीच्या वैद्यकीय कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी वगळता कुणालाही शहरात प्रवेश दिला जाणार नाही. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, पिंपळगांव चौक आणि बसस्थानका जवळ असणाऱ्या मुळेवाडी रस्त्याकडे पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. घोडेगाव रस्ता बाजारतळ आणि पिंपळगांव रस्त्यावरील शितळामाता मंदिराजवळ बांबू लावून रस्ते बंद केले आहेत, अशी माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.
एकलहरे येथील गावठाण आणि लोंढेमळा परिसरात 1 महिला, पारगांव येथील बालाजी कॉम्प्लेक्स येथे एक तरुण करोनाबाधित आढळल्याने हा भाग प्रतिबंधित क्षेत्र, तसेच हा भाग केंद्रस्थानी धरून 5 किलोमीटरचा परिसर पुढील आदेश येईपर्यंत बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.