मंचर – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे रवी तबला मेकर्स दुकानाचे लोंखडी शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून तांब्याचे तीन नगारे आणि सहा ताशे असा एकू सुमारे 1 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे शुक्रवारी (दि. 26) सकाळी उघडकीस आले.
घोडेगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळा नं 27 आणि 28 मध्ये तबला-पखवाज दुरुस्तीचे दुकान आहे. बुधवारी रात्री अज्ञात गाडी लाईटच्या खांबाला धडकल्याने लाईट गेल्याचा फायदा घेऊन भुरट्या चोरांनी डाव साधला. कटावणीने दुकानाचे शटर उचकटून दुरुस्तीसाठी आलेले भीमाशंकर येथील कमलजादेवी मंदिर देवस्थानचे 3 नगारे, स्टीलचे 4 ताशे, पितळेचा एक ताशा असे एकूण 70 हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याचे दुकानमालक रवींद्र मारुती शेटे यांनी सांगितले.
शरद बॅंक, भीमाशंकर साखर कारखाना, विभागीय कार्यालय व ग्रामीण रुग्णालय नजीक असताना येथे भुरट्या चोरांनी डाव साधला. दुर्मिळ तबला आणि पखवाज दुरुस्ती कारागीराचे कुंटुब चोरीच्या घटनेने खचून गेले आहे. दुकानाच्या जवळच लग्न असल्याने रात्री मोठा धिंगाणा सुरू होता, त्यामुळे भुरटे चोर जवळपासचेच असावेत, असा संशय व्यक्त होत आहे. घटनास्थळी घोडेगांव पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.