येरवडा (प्रतिनिधी)- दुचाकी वाहन चोरून त्यावरून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे गुन्हे करणाऱ्या दोघा सराईत आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करून जेरबंद केले. याप्रकरणी विक्रम सूर्यनारायण पांडे (वय 35, रा. खांदवे नगर वाघोली) व विक्रम रमाकांत जाधव( वय 33 रा. बावधन पुणे) या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून दोन सोनसाखळी चोरी व दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथे आठ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मंगला मुरली महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी हिसका मारुन लंपास केली होती. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून या गुन्ह्याच्या तपास सुरु केला असता तपास पथकातील पोलिस कर्मचारी प्रवीण भालचीम व प्रफुल्ल मोरे यांनी आरोपी पळालेल्या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. या तांत्रिक तपासावरून या दोन सराईत आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांना ताब्यात घेतले असता त्यांनी सोनसाखळीचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. त्याचवेळी आरोपींनी विश्रांतवाडी व चंदननगर येथे केलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
या गुन्ह्याच्या तपासात दाखल दोन गुन्ह्यातील तीन सोन्याच्या चैनी व दोन चोरीच्या दुचाकी विश्रांतवाडी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी,पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, गुन्हे निरीक्षक रवींद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक लहू सातपुते, पोलीस कर्मचारी विजय सावंत, प्रवीण भालचिम, प्रफुल मोरे,यशवंत किरवे,किशोर दुशिंग,अझरुद्दीन पठाण,शेखर खराडे,रिहान पठाण,संदीप देवकाते,अनिकेत भिंगारे यांनी ही कामगिरी बजावली.