पुणे – पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर मनास्लू सर केले आहे. गेल्या सहा महिन्यांत जितेंद्र यांनी तीन अष्टहजारी हिमशिखरे सर करत नवा विक्रम साकार केला आहे.
मनास्लू हे शिखर नेपाळमधील गोरखा भागात असून, याची उंची 8 हजार 163 मीटर आहे. हे जगातील आठव्या क्रमांकाचे शिखर आहे. मनास्लूवर आजवर फार कमी भारतीय गिर्यारोहकांनी यश मिळवलेले आहे. गवारे यांना ज्येष्ठ गिर्यारोहक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन लाभले.
वैद्यकीय भाषेत आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर मानवी शरीर फारसे तग धरू शकत नाही. जगात अशी 14 शिखरे आहेत, ज्यांची उंची 8 हजार मीटरहून अधिक आहे. ही सर्व हिमालयामध्ये असून, त्यांना अष्टहजारी हिमशिखरे असे संबोधतात.
जितेंद्र यांनी या 14 मधील माउंट अन्नपूर्णा -1, माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मनास्लू अशी तीन अष्टहजारी हिमशिखरे केवळ सहा महिन्यांत सर करत नवा विक्रम साकार केला आहे.