नाशिक – जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धा नाशिक जिमखाना येथे दि. 3 ते दि. 6 ऑक्टोबरदरम्यान पार पडणार आहेत.
या स्पर्धेत 19 व 21 वर्षांखालील वयोगटातील मुले व मुली एकेरी तसेच पुरुष व महिला एकेरी अशा सहा गटांत होणार आहेत. या स्पर्धेच्या कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड होणार आहे.
स्पर्धा आयोजन करताना कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून शासकीय नियमाप्रमाणे हॉलमध्ये नियमानुसार ठरवून दिलेल्या संख्येइतकेच खेळाडू आणि त्यांचे मार्गदर्शक व इतर व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.
स्पर्धेतील सहभागी प्रत्येक खेळाडूंना तसेच पंचांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केलेले असून हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाचे तापमान आणि पल्स तपासण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 385 प्रवेशिका आल्या आहेत.