सातारा -छत्रपती शिवाजी संग्रहालयात उभ्या राहिलेल्या 301 बेडच्या जंबो हॉस्पिटलचे व्यवस्थापन पुणे येथील सुप्रसिद्ध रुबी एल केअर या संस्थेकडे सोपवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने या संस्थेशी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व परिचारिका पुरविण्याचा करार केला आहे.
जंबो हॉस्पिटल येत्या आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी “प्रभात”ला दिली. जंबो हॉस्पिटलच्या उभारणीचे काम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी “क्रेडाई’ला दिले असून “क्रेडाई’ने युद्धपातळीवर काम करत हे हॉस्पिटल पूर्णत्वाला आणले आहे. रुफिंग, सिलिंग, सेंट्रल ऑक्सिजन लाइन, गेस्ट रुम, पार्किंग व्यवस्था, सॅनिटरी नियोजन, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येकी 16 बेडचे सेक्शन याप्रमाणे 250 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे व 51 व्हेंटिलेटर बेड अतिदक्षता विभागात व्यवस्था करण्यात आली आहे. जंबो हॉस्पिटलच्या निर्दोष व्यवस्थापनासाठी कुशल मनुष्यबळाचा प्रश्न होता. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तो सोडवला आहे. प्रशासनाने आमंत्रित केलेल्या निविदा प्रक्रियेत प्राप्त तीन निविदांपैकी मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी रुबी अल केअरची निविदा अंतिम करण्यात आली. “बीव्हीजी’च्यासुद्धा दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र, व्यवस्थापन आणि देखभाल यामध्ये रुबी एल केअरला पसंती मिळाली.
पुणे येथील रुबी मेडिकलची उपशाखा असणाऱ्या रुबी केअरचे नाव वैद्यकीय सेवा व्यवस्थापनामध्ये अग्रभागी असून पुणे येथील जंबो हॉस्पिटलच्या उभारणीत त्यांचाच मोठा वाटा होता. ही फर्म पीपीपी तत्वावर उभारण्यात आली असून सहा तासांच्या तीन शिफ्टमध्ये आवश्यक असणारे साधारण 40 डॉक्टर व 150 जणांचा मेडिकल स्टाफ, इतर सेवांचा समन्वय व देखभाल रूबी केअरने आपल्या खांद्यावर घेतली आहे. या रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार असल्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी नुकतीच या हॉस्पिटलची पाहणी केली.