भारतीय वंशाच्या संसद सदस्या प्रमिला जयपाल यांचा पाठलाग ; संबंधित व्यक्तीला 364..
न्यूयॉर्क :- अमेरिकेतील भारतीय वंशाच्या संसद सदस्या प्रमिला जयपाल यांचा पाठलाग केल्याबद्दल एका व्यक्तीला 364 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ब्रेट फोर्सेल असे या व्यक्तीचे नाव असून सिएटलमधील किंग कौंटीतील न्यायालयाने गंभीर गुन्ह्याऐवजी गैरवर्तवणुकीच्या आरोपात दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावली आहे.
वर्षभरापूर्वी त्याला प्रमिला जयपाल यांच्या घराबाहेरून अटक केली गेली होती. त्यावेळी त्याच्याकडे हॅन्डगन असल्याचेही आढळून आले होते. त्याने प्रमिला जयपाल यांना “भारतात परत जा’ असे सांगितले होते आणि ठार मारण्याची धमकीही दिली होती, असा पोलिसांचा आरोप होता. मात्र हा आरोप सिद्ध केला जाऊ शकला नव्हता.
फोर्सेल याने जयपाल यांना वारंवार धमक्या दिल्या होत्या. त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका जाणवल्यामुळे जयपाल यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.
जयपाल या मूळच्या चेन्नईमधील असून अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहामध्ये निवडून जाणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.