नाशिक – नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वादाला तोंड फुटले असून शहरातील मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर मंगळवारी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते व यावेळी दोन्ही गटाकडून मोठी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आली. त्याचमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाल्यानंतर पोलिसांकडून गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ हे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. याचा परिणाम मंगळवार सकाळपासूनच दिसून येत आहे. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी भवन कार्यालयावर ताबा सांगितला जात होता. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्यांकडून कार्यालयावर ताबाही घेण्यात आला. दुपारी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून बैठक होणार होती. मात्र तत्पूर्वीच भुजबळ गटाचे समर्थक कार्यालयात आल्याने गोंधळ सुरु झाला.
दुपारी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरु झाला तेव्हा, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार देखील उपस्थित होते. माजी नगरसेवक गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड इथे समर्थकांसह उपस्थित होते. गजानन शेलार हे शरद पवारांच्या बाजूने उभे होते तर आव्हाड चर्चा करून मार्ग काढा, या भूमिकेमध्ये होते.