उद्‌भवलेली पूरस्थिती मानवनिर्मितच!

बचाव कार्य करणाऱ्या एनडीआरएफ आणि संस्थांचा सत्कार

पुणे – सध्या उद्‌भवणारी पूरस्थिती ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. निसर्गातील मानवाचा वाढता हस्तक्षेप हाच या पुरासाठी कारणीभूत ठरत आहे. याबाबत पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी देखील पूर्वसूचना दिली होती. अनेक पर्यावरण अभ्यासक वारंवार हेच सांगत आहेत. मात्र, अजूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. भविष्यातील असे धोके टाळण्यासाठी आपण वेळीच सावध झाले पाहिजे, असे मत पर्यावरण कार्यकर्ते सत्या नटराजन यांनी व्यक्त केले.

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय आणि “इनक्रेडिबल पुणे ग्रुप ‘ या संस्थेतर्फे सांगली-कोल्हापूर येथे उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीत नागरिकांचा बचाव करणारे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान (एनडीआरएफ), विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, डॉक्‍टर्स अशा तब्बल 52 व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. नटराजन यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी. ए. इनामदार, संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी डॉ. निहाल मयूर, इनक्रेडिबल पुणेचे असिफ बागवान, आबेदा इनामदारच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला उपस्थित होत्या.

नटराजन म्हणाले, पूरस्थितीत काम करताना अनेक चांगल्या नागरिकांची ओळख झाली. हा एक वेगळा अनुभव होता. मात्र, अशाप्रकारची भयानक परिस्थिती पुन्हा उपलब्ध होणार नाही यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. आपल्या पर्यावरणच्या रक्षणासाठी पुढाकार घेऊन काम केले तरच आपले भविष्य सुरक्षित राहील, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.