सोसायटीधारक देणार मागण्यांची सनद : पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या संघटनेचा पुढाकार
पिंपरी – सध्या विधानसभा निवडणुका सुरू झाल्या असून सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचाराला वेग आणला आहे. मत मागण्यासाठी सोसायट्यांमध्ये जाणाऱ्या उमेदवारांना आता मागण्यांचा पाढाच ऐकावा लागणार आहे. सोसायटीमध्ये नागरिकांना दैनंदिन जीवनात कित्येक समस्यांशी झुंजावे लागत आहे. या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने निवडणुकीच्या काळात आता उमेदवारांच्या हाती मागण्यांची सनद देण्यात येणार आहे.
सोसायटीधारकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी मागण्यांची सनद तयार करण्यात आली आहे. ही सनद पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना दिली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर पुढील पाच वर्षांमध्ये उमेदवारांनी या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे राजे यांनी नमूद केले. संबंधित सनद पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशन, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि पुणे सोसायटी वेल्फेअर असोसिएशन यांनी संयुक्तपणे तयार केली आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 ची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
ग्राहक ई-न्यायालयांची व्हायला हवी स्थापना “महारेरा’ कायदा कागदोपत्री राहू नये त्यासाठी स्थापन करावा स्वतंत्र अंमलबजावणी विभाग महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत गृहनिर्माण संस्था आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याची व्यवस्था असावी.
त्यासाठी तालुका स्तरावर करावे अधिकारी नियुक्त पोलिस आयुक्तालय कार्यालयात सदनिका खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी “भरोसा सेल’ची व्हायला हवी स्थापना सोसायटीधारकांना पाणी, रस्ते, वीज आदी मुलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. अशा सुविधा दिल्याशिवाय स्थानिक स्वराज संस्थांनी कर आकारणी करू नये किंवा बांधकाम परवानगी देऊ नये. प्रभाग समित्यांमध्ये बिगरराजकीय व्यक्तींची नेमणूक करून तातडीने क्षेत्र सभेच्या नियमांची अंमलबजावणी करावी. महावितरणकडून सोसायट्यांना दिल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यात सुधारणा होणे आवश्यक आहे.