नवी दिल्ली – “फणी’ चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरून दुर गेले असले तरी आता त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला लोकसभा निवडणूक सुरु असताना दुसऱ्याकडे नैसर्गिक आपत्तीवरून राजकीय वादळ सुरु झाले आहे. तृणमूल कॉंग्रेसने फणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
पंतप्रधान कार्यालयातून “फणी’ चक्रीवादळासंदर्भात माहिती घेण्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना फोन करण्यात आले होते. पण तृणमूलने असा दावा केली की पीएमओकडून केवळ राज्यपालांनाच फोन केला गेला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केला गेला नाही. तृणमूलच्या मते या गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.
तृणमूलने दावा केला आहे की मोदींनी ममतांना फोन करून फणी चक्रावादळासंदर्भात माहितीच घेतली नाही. मात्र पंतप्रधान कार्यालयाने तृणमूलचा हा दावा फेटाळून लावला आहे. ममता बॅनर्जींशी बोलण्यासाठी दोन वेळा फोन केला गेला. पण त्या फोनवर आल्या नाहीत.
पीएमओमधील अधिकाऱ्यांनी दोन वेळा मोदींची मुख्यमंत्री ममता यांच्याशी बोलण्याचा फोन केला. पण दोन्हीवेळा त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर पीएमओमधील सूत्रांनी ही माहिती दिली.
पहिल्यांदा फोन केल्यानंतर मुख्यमंत्री दौऱ्यावर असल्याचे सांगितले गेले आणि पीएमओला फोन केला जाईल, असे सांगण्यात आले. दुसऱ्यांदा फोन केल्यावर देखील हेच उत्तर देण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री ममता यांच्याशी चर्चा न झाल्याने अखेर मोदींनी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याशी फोनवर चर्चा केली, अशी माहिती देण्यात आली.