नागपूर – कुरखेडा तालुक्यातील वाहने जाळपोळ आणि भुसुरूंग स्फोटानंतर नक्षलवादी आणखी हिंसक झाले आहेत. भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज (रविवारी) उघडकीस आली आहे. मागील सहा दिवसांत ही तिसरी घटना आहे. पोलीस खबऱ्या असल्याचा संशयावरून नक्षलवाद्यांनी या व्यक्तीची हत्या केली असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
डोंगा कोमटी वेडदा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो नैनवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. तो लग्नसमारंभासाठी मर्दहूर येथे आला होता. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी त्याचे अपहरण करून त्याची निघृण हत्या केली. या घटनेची पोलीसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.