मुंबई – पुढील लोकसभा निवडणुकीत राजकीय मतभेद विसरून कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तयार आहेत. भाजपविरोधात आघाडी करण्याच्या उद्देशातून विरोधी पक्ष एकत्र येण्याविषयी त्या अनुकूल आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी म्हटले.
सध्या विरोधी पक्षांच्या गोटात एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मात्र, कॉंग्रेसविषयी ममता अनुकूल नसल्याचे चित्र आहे. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पवार यांनी उत्तर दिले. देश हितासाठी आणि भाजपपुढे तगडे आव्हान उभे करण्यासाठी कॉंग्रेसला साथ देण्याची तयारी असल्याचे स्वत: ममतांनीच स्पष्ट केले आहे, असे त्यांनी नमूद केले.
माझ्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि इतर काही नेत्यांची कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्यास कुठलीही हरकत नाही, अशी पुस्तीही पवार यांनी जोडली. त्यांनी मांडलेली भूमिका पाहता राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याचे मन विरोधकांनी बनवल्याचे सूचित होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा सहभाग असणारी विरोधकांची व्यापक आघाडी उभी राहण्याची शक्यता बळावली आहे.