नवा रायपुर – कॉंग्रेस महासमितीच्या अधिवेशनाला आज पासून येथे प्रारंभ झाला. हे अधिवेशन तीन दिवस चालणार आहे. अधिवेशनाच्या आधी पक्षाच्या सुकाणु समितीची बैठक झाली. त्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर सदस्य नियुक्त करण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या संबंधात माहिती देताना पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, पक्षाच्या सुकाणु समितीत कार्यकारीणी सदस्यांच्या निवडीच्या विषयावर खुली चर्चा झाली. यावेळी उपस्थित सर्व 45 सदस्यांनी याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्षांना देण्याचा निर्णय एकमताने मंजुर केला.
पक्षाध्यक्षांना असे अधिकार देण्याच्या बाजूने आणि विरोधात अशी दोन्ही प्रकारची मते या चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आली. पण सरतेशेवटी हा अधिकार पक्षाध्यक्षांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असे ते म्हणाले. ते म्हणाले की, पक्षाच्या घटनेतील कलम 32 मध्ये सोळा बदल सुचवण्यात आले आहेत. त्यावरही या महाअधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. या घटनादुरूस्तीनुसार पक्षाचे सर्व माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधानांना कार्यकारीणीचे सदस्य म्हणून स्थान दिले जाणार आहे. सुरूवातीला पक्षाध्यक्ष खर्गे यांनी उपस्थित सर्व सदस्यांनी कार्यकारीणीच्या रचनेविषयी मोकळेपणाने आपली मते मांडण्याची सूचना केली.
मोठी बातमी! औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’! नामांतरास केंद्राची मंजूरी
पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सकाळपर्यंत रायपुरला पोहचले नव्हते. त्यामुळे ते पक्षाच्या सुकाणु समितीच्या बैठकीला उपस्थित नव्हते. तथापी दुपारी त्यांचे रायपुर मध्ये आगमन झाले. त्यानंतर ते पुढील सर्व बैठकांना उपस्थित राहणार आहेत असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
कॉंग्रेस कार्यकारीणीत सध्याच्या रचनेनुसार एकूण 25 सदस्य असतात. त्यापैकी कॉंग्रेसचे संसदेतील नेते व पक्षाध्यक्ष हे कायम सदस्य असतात. 12 सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जातात आणि उर्वरीत 11 सदस्य पक्षाध्यक्षांकडून नियुक्त केले जातात.