नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्ष यांच्यातील संघर्ष आजही सुरू होता. आता स्थायी समितीच्या निवडणुकीवरून दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये जुंपली आणि प्रकरण पार हाणामारीपर्यंत गेले. शुक्रवारी उशीरापर्यंत हा प्रकार सुरू होता व दोन्ही पक्षांनी परस्परांवर आरोप केले आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांनी स्थायी समितीसाठी दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य निवडले होते. मात्र आपच्या महापौर शैली ओबेरॉय यांच्याकडून भाजपचा एक सदस्य कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपने केला. त्यावरून संघर्ष सुरू झाला आणि सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला. महापालिकेच्या कामकाजाची जी छायाचित्रे बाहेर आली आणि ज्या क्लीन व्हायरल झाल्या त्यात आप आणि भाजपचे सदस्य परस्परांवर हल्ला करताना दिसून आले. या प्रकारात काही सदस्य जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे हाणामारीत दोन्ही पक्षांच्या महिला सदस्यांचाही सहभाग होता. मारामारीत आपचे अशोक कुमार मन्नू बेशुध्द झाल्याचे वृत्त आहे व तसे छायाचित्रांतूनही दिसत होते. दरम्यान, भाजपचे सदस्य निर्लज्ज असून त्यांनी महिला सदस्यांवर आणि अगदी महापौरांवरही हल्ला केल्याचा आरोप नंतर शुध्दीवर आलेल्या मन्नू यांनी केला.
मोठी बातमी! औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’! नामांतरास केंद्राची मंजूरी
हिंसाचाराला सुरूवात विरोधी पक्षाने केली असा आरोप दोन्ही बाजूने केला जातो आहे. आपच्या आमदार आतिशी यांनी याचे खापर भाजपवरच फोडण्याचा प्रयत्न केला. तर भाजपने आतिशी यांचाच एक व्हिडिओ जारी केला असून त्याचा आपच्या सदस्यांना हिंसाचार करण्यासाठी चिथावणी देत असल्याचा आरोप भाजपने केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर आपची हुकुमशाही आणि गुंडगिरी सुरू असल्याची टीकाही भाजपने केली आहे.