माळीनगरला खेळांसह उभे रिंगण रंगले

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बोरगाव मुक्‍कामी

– नीलकंठ मोहिते

माळीनगर –
उभा-उभीचे फळ ।
अंगी मंत्राचीया बळ।।
मला विठ्ठल विठ्ठल गोड।
आणि सत्य बोल।।
कळी काळाचा बाधा।
नव्हे उच्चारीत सदा।।
उभा-उभी मिळणारे फळ हे त्रिकाल टिकणारे असते आणि हेच मिळणारे फळ एखाद्या विधीवत मंत्राच्या ताकतीचे असते. हीच वाणी तुकोबांची ध्यानी धरून, विठ्ठल विठ्ठल…विठ्ठलाचे गोड आणि मुखी नामघोष जागेवरच करून, अनेक खेळ खेळून अश्‍वांची चप्पल चित्त्याच्या वेगाने दौड होऊन, शेवटी उडी खेळाची लीलया करून, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे उभे रिंगण माळीनगर येथे ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात पार पडले. लाखो उपस्थित भक्तगणांनी फुलांची उधळण अश्‍वावर करीत पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एकूण सहा रिंगणे असतात, यापैकी तीन रिंगणे हरिनामाच्या जयघोषात पार पडली आहेत. तीन उभी रिंगणांपैकी पहिले मानाचे उभे रिंगण माळीनगर येथे प्रथे प्रमाणे पार पडले. हे रिंगण श्रीहरीनगर ते पोस्ट कार्यालयापर्यंत सुरू होते. सकाळच्या प्रहरी संत तुकोबांचा पालखी सोहळा माळीनगर गावच्या हद्दीत दाखल झाला. भक्तीरसपूर्ण उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.

विठ्ठलमय वातावरणात पालखी सोहळ्यातील वारकरी माळीनगरच्या दिशेने पुढे सरकत माळीनगर रोडवरील श्रीहरी नगर येथे उभ्या रिंगणासाठी येऊन जागेवर थांबले. पहिले उभे रिंगण पार पडण्यासाठी पताका धारक वारकरी, तुळशी धारक महिला, विनेकरी, पखवाज वादक, टाळकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांग करून ज्ञानोबा तुकाराम.., भजनाचा ठेका धरून नामस्मरण करीत होते. ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळा प्रमुखाचे व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. अश्‍वाच्या पूजेनंतर घोडेस्वारांनी उभ्या रिंगणात प्रथम फेरी मारली, त्यानंतर दुसरा घोडेस्वार हातात पताका घेऊन घोड्यावर स्वार झाला. अतिशय वेगाने धावणाऱ्या या अश्‍वाने तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन घेऊन फेरी पूर्ण केली. तद्‌नंतर अश्‍वांच्या पाऊलखुणाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.

माळीनगर भागात उभे रिंगण होणार असल्याने माळशिरस तसेच पंढरपूर तालुक्‍यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे हजेरी लावली होती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर होमगार्ड व माळीनगर कारखान्याचे सुरक्षारक्षक मोठ्या संख्येने तैनात होते. रिंगण सोहळा संपल्यानंतर मॉडेल हायस्कूलच्या मैदानावरील ओपन थेटरमध्ये पालखी सोहळा पहिल्या विश्रांतीसाठी विसावला. यावेळी शुगर केन सोसायटीच्यावतीने पालखीतील पादुकांना मानाचा अभिषेक घालण्यात आला. दि सासवड माळी शुगरच्या कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांना अन्नदान केले. पहिली, दुसरी विश्रांती व दुपारचे न्याहारी घेऊन बोरगाव मुक्कामाकडे पालखी मार्गस्थ झाली. पायरीचा पुल, कदम वस्ती, श्रीपुर साखर कारखाना मार्गे बोरगावी पालखी मुक्‍कामासाठी विसावला आहे.

पंढरपूर तालुक्‍यात आज प्रवेश
तुकोबांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि.9) सकाळी माळखांबी तोंडले-बोंडले मार्गे पिराची कुरोली येथे सोहळा पालखी मुक्‍कामाला मार्गस्थ होणार आहे.सोहळा पिराची कुरोली येथे पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्‍कामी पोहोचेल.

Leave A Reply

Your email address will not be published.